पुणे ः गणेशाेत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र खरेदीसाठीची, सजावटीची लगबग दिसून येत आहे. विसर्जन मिरवणुकीत ढाेलताशा पथकांची वेगळीच शान असते. पुण्याची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी देशभरातून गणेशभक्त येत असतात. महिनाभरापासून पुण्यातले अनेक ढाेल-ताशा पथक अथक मेहनत करत असतात. अशातच पुण्यातील विष्णुनाद नावाचे एक पथक या मिरवणुकीमध्ये गेल्या काही वर्षांपासून शंखनाद करत आहे. शंख वाजवून खऱ्या अर्थाने कुठल्याही कार्याची सुरुवात हाेत असते. एकत्रित शंखनाद करणारे विष्णुनाद हे एकमेव पथक असून विविध मंडळांच्या समाेर ते शंखनाद करतात.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात पारंपारिक वाद्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. आजमितीला शहरात शेकडाे ढाेला-ताशा पथक असून विविध मंडळांच्या मिरवणुकीत ते सहभागी हाेतात. मानाच्या पाच गणपतींच्या समाेर देखील ढाेल-ताशा पथकांचे वादन हाेत असते. या पथकांची तरुणाईमध्ये माेठी क्रेझ आहे. अनेक तरुण या पथकांमध्ये सहभागी हाेत आहेत. त्यातच पारंपारिक तालाबराेबरतच इतर मंत्रमुग्ध करणारे तालांचा समावेश या पथकांकडून केला जात आहे. पुण्यातील काही तरुण एकत्र येत त्यांनी आता शंखनादाचे पथक सुरु केले आहे. या पथकाकडून केवळ शंखनाद केला जाताे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकीत हे पथक सहभागी हाेत असून नागरिकांच्या आकर्षणाचा आता हे पथक विषय झाले आहे.
या पथकाचे प्रमुख अनय अष्टपुत्रे म्हणाले, शंख हे पारंपारिक वाद्य आहे. भारतीय परंपरा जाेपासण्याची एक संधी म्हणून आम्ही विष्णुनाद पथक सुरु करण्याचे ठरवले. या वाद्याचे अनेक शाररिक फायदे सुद्धा आहेत. ते लाेकांपर्यंत पाेहचावेत हा देखील एक हेतू हाेता. हे वाद्य वाजविण्याची एक मजा सुद्धा आहे. त्यातून मिळणारा आनंद देखील वेगळा असताे. काही वर्षांपूर्वी मी मानाचा दुसरा गणपती तांबडी जाेगेश्वरी या मंडळाच्या मिरवणुकीत शंख वाजवला हाेता. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तेव्हा आपण ग्रुपमध्ये शंख वाजवला तर त्यातून एक उत्तम निर्मिती हाेईल या विचारातून ग्रुप सुरु केला. ढाेल- ताशांच्या तालाबराेबरच शंखनादाचं फ्युजन यंदाही पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.