पुणे : गोल्ड ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास वार्षिक ३५ टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून १४ जणांची एक कोटी ६५ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणात हैराबाद येथील नामांकित हिरा ग्रुप्स कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महिलेला लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.नवहिरा नन्हेसाहेब शेख (वय ५४, रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. तिला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी दिला. तिचे दोन साथीदार दाऊद मेहबूब खान (वय ६५, रा. कॅम्प) व रेहान शेख (वय ५०, रा. रविवार पेठ) यांच्यावरदेखील फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९नुसार गुन्हा दाखल केला आहे. मखदूम हाजी मोहंमद गौस सिद्दीबिलाल (वय ६७, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीबिलाल व इतर १४ ठेविदारांना आरोपींनी हिरा गोल्ड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर वार्षिक ३५ टक्के परतावा व सदरचा परताव्यातील काही रक्कम प्रतिमहिना देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून ५ लाख रुपये व त्यांच्या कुटुंबातील इतर चार जणांकडून १२ लाख रुपये, असे एकूण १७ लाख रुपये व इतर १० जणांकडून वेळोवेळी एक कोटी ४८ लाख रुपये, असे एकूण १ कोटी ६५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावरील मिळणारे फायदे आणि परतावा न करता त्याचा अपहार केला. शेख हिच्यावर नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध शहरांत गुन्हे दाखल आहेत. गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यवधी रुपये तिने विविध ठिकाणी गुंतवले असून त्याबाबत तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात किती जणांचा समावेश आहे, याबाबत माहिती घ्यायची आहे.फसवणूक करून मिळविलेली रक्कम कोठे ठेवण्यात आली अथवा तिचा कोठे वापर केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे तिला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील जावेद खान यांनी केली. बचाव पक्षाचे वकील रहमान शेख यांनी युक्तिवात केला, की शेख यांना कोणत्याही गुंतवणूकदारांचे पैसे बुडवयाचे नसून त्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे देण्यास तयार आहेत. मात्र, त्यांची सर्व बँक खाती, लॅपटॉप, मोबाईल नवी मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच सील केल्याने त्यांना पैशांची परतफेड करता येत नाही.
हिरा ग्रुपची संचालिका नवहिरा शेखला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 1:55 AM