पुणे : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा दावा शुक्रवारी मागे घेतला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. वर्षभर हा खटला सुरू होता. मात्र,या खटल्याच्या सुनावणीसाठी गिरीश बापट उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे बापट यांनी स्वत:हून हा दावा मागे घेतला. शुक्रवारी सकाळी बापट आणि मलिक हे खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते. मलिक यांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे, असे आरोप केले होते. जीवनावश्यक वस्तू कायद्यााअंतर्गत कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या तूरडाळीच्या साठ्याची योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून डाळ जप्त करण्यात आली होती. या डाळीचा जाहीर लिलाव करण्याचे ठरवण्यात आले. तेव्हा मलिक यांनी बापटांनी तूरडाळ प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. यामुळे आपली बदनामी झाल्याचे म्हणत बापट यांनी न्यायालयातील जबाबात म्हटले होते. या आरोपांना बापट यांनी न्यायालयात आव्हान दिले. जी डाळ जप्त करण्यात आली ती ५४० कोटी रुपयांची होती. त्यामध्ये फक्त १४० कोटी रुपयांची तूरडाळ होती व मुक्त करण्यात आलेल्या डाळींची किंमत ४३ कोटी रुपयांची होती. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचार झाला नाही असा दावा बापट यांनी केला. मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नसल्याने हा आरोप केल्याचेही बापट यांनी म्हटले होते. या प्रकरणी मलिक यांना समन्सही बजावण्यात आले होते. बापट यांच्या वतीने अॅड. एस. के. जैन आणि अॅड. अमोल डांगे यांनी ही याचिका दाखल केली होती. आरोप आजही कायम : मलिकबापट यांनी स्वत:हून हा दावा मागे घेतला. बापट यांनी दावा मागे घेतला असला तरीही तूरडाळ गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावरचे आरोप आजही कायम असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. माझे आरोप सरकारी धोरणांवर होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यक्तिगत जीवनातील आरोप सहन करणार नाही : बापट लोकायुक्तांसह आता न्यायालयानेही मला क्लिन चीट दिली आहे. मी व्यक्तिगत जीवनात कोणतेही आरोप सहन करत नाही. म्हणूनच मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. प्रत्यक्षात आम्ही ५१ कोटी रुपयांच्या डाळींचे वाटप केले. त्यावर कोटी ८ हजार कोणी १० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला. त्यातून मी आता निर्दोष मुक्त झालो आहे. सरकारी धोरणांवर आरोप करायला माझी काहीच हरकत नाही मी त्यांचे स्वागत करेन.