पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडरकरांच्या विचारांवर चालणारा आंबेडकरवादी नक्षली असू शकत नाही आणि नक्षली आंबेडकरी असू शकत नाही. डॉ. आंबेडकर आणि मार्क्स यांचे विचार भिन्न आहेत. आंबेडकरी अनुयायांनी आणि तरुणांनी मार्क्सवादी होऊ नये. आंबेडकरी विचाराला मार्क्सवाद मारक ठरु शकतो. डॉ. आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारात साम्य असल्याची होणारी मांडणी अत्यंत चुकीची असून आंबेडकरांनी मार्क्सवादाचा विरोध केलेला असल्याचे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आरपीआय (ए)च्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिका-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, अयुब शेख आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे एल्गार परिषदेलाही परवानगी मिळणार नाही. पोलिसांची परवानगी नसेल तर कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास करु नये. शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमुळे त्यावेळी दंगल झाली असे म्हणता येणार नाही. या परिषदेत नक्षली सहभागी होते की नाही हा तपासाचा भाग आहे. ग्रामीण आणि शहरी नक्षलवाद सुरु असून त्याला आमचा कडाडून विरोध आहे. पँथर काळापासून हा विरोध असून आंबेडकरी चळवळीचा नक्षली चळवळीला कायमच विरोध राहिलेला आहे.
====
जर, महाविकास आघाडीकडे पुरावे असतील तर त्यांनी संभाजी भिडेंवर कारवाई करावी. परंतु, आरोप करणारे सत्तेत आल्यानंतर मूग गिळून बसल्याची टीका त्यांनी केली.
====
शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीशी आम्ही सहमत नाही. हा कायदा रद्द झाल्यास सर्वच कायदे रद्द करण्याची मागणी होईल. असे झाले तर संविधान धोक्यात येईल. शेतक-यांना भडकावले जात आहे.
====