लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्याचा निकाल उद्या (सोमवार दि. ८) देण्यात येणार आहे. गेली सात वर्षे या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी (वय २८) यांचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा खून केला होता. या प्रकरणी योगेश अशोक राऊत (वय २४, रा. गोळेगाव, ता. खेड), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघीगाव, मूळ रा. ता. खटाव, जि. सातारा) या चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ८ ते ९ आॅक्टोबर २००९ रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणी सुरू झाल्यानंतर मुख्य आरोपी योगेश राऊत ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीवर परिणाम झाला होता. गुन्हे शाखेने त्याला शिर्डीमध्ये अटक केली. राऊत याला पळून गेल्याच्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. आतापर्यंत या खटल्याची सुनावणी चार न्यायाधीशांपुढे झाली आहे. सरकार पक्षातर्फे या खटल्यात ३७ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. बचाव पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर हे काम पाहात आहेत. बचाव पक्षातर्फे बी. ए. अलूर, रणजीत ढोमसे पाटील आणि अंकुशराजे जाधव काम पाहात आहेत. या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदविण्यात आला होता. बचाव पक्षातर्फे त्यावर उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौधरी माफीचा साक्षीदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले.
नयना पुजारी खून खटल्याचा आज निकाल
By admin | Published: May 08, 2017 3:26 AM