जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एकूण ७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असणा-या या जलाशयात आज ६१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असल्याची माहिती नाझरे प्रकल्प शाखाधिकारी एस. जी. चौलंग यांनी दिली.गेल्या महिनाभरात पुरंदर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील लहानमोठे तलाव, पाझर तलाव, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासनावर आलेला ताण कमी झाला आहे. शेतकरी वर्गातही परतीच्या पावसाने समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातील हजेरी लावलेल्या वरुणराजाने तोंड फिरवले होते. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला होता. पश्चिम, दक्षिण पुरंदरचा पट्टा वगळता उर्वरित भागातील खरीप हंगाम वाया गेला होता. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरीवगार्तून मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीही होऊ लागली होती.मात्र, परतीच्या पावसाने चांगलेच समाधान निर्माण केले आहे. पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. यातूनही टिकून राहिलेल्या खरीप पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान केले असले, तरीही रब्बी हंगामाची खात्री निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक खेड्यांतून गेल्या सात-आठ वर्षांपासून न वाहिलेले ओढेनाले भरून वाहू लागल्याने विहिरीतून ही पाणीसाठा निर्माण झाला आहे.>सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणाररब्बी हंगामाच्या वर्षाकाठी आवर्तनापैकी एखादे-दुसरे आवर्तन मिळू शकेल, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जलाशयावरील जेजुरी, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आयएसएमटी कंपनी, तसेच मोरगाव व १६ गावांची प्रादेशिक योजना, नाझरे व ५ गावे प्रादेशिक योजना, पारगाव, माळशिरस २३ गावांची योजना आदी ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वर्षभर पाणीपुरवठा करू शकणार आहेत. शिवाय, जलाशयावरील सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘नाझरे’ तहान भागविणार!, बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:22 AM