बारामती : फळविक्रेत्यांची अवाजवी रक्कमेचा नोटरी करारनामा करीत फसवणूक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह सहा जणांवर २७ डिसेंबर २०२० रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नाझीरकर यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला. मात्र,बारामती शहर पोलीस अद्यापपर्यंत नाझीरकर यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्यानंतर मागील वर्षी २७ डिसेंबर रोजी फळे विक्रीचा सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करत फसवणूक केल्याप्रकरणी नाझीरकर यांच्यासह ६ जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी वाजीद छोटु बागवान(वय ५५, रा. म्हाडा कॉलनी,बारामती) यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार राहूल शिवाजी खोमणे, हनुमंत जगन्नाथ नाझीरकर, संगीता हनुमंत नाझीरकर, गीतांजली हनुमंत नाझीरकर (सर्व रा. शिरवली, ता. बारामती) सतीश भिकाराम वायसे (रा.अंजनगाव, ता. बारामती), गुलाब देना धावडे (रा. सोमंथळी, ता. फलटण,जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणात नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज बारामती सत्र न्यायालयात केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन ६ जानेवारी रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी कोणत्याही अटीशिवाय त्यांनी अर्ज मागे घेतला. २२ जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांना अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली.
या सर्व प्रकारानंतरही पोलीस हनुमंत नाझीरकर यांना अजून अटक करु शकले नाही. पुण्यातही त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे.
.......
बारामती शहर पोलीस त्यांना अटक करणार आहे. यासंदर्भात तपास सुरु आहे. पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याचे बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले.