पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याच्या नाशिकमधील कारखान्यावर छापा टाकून ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (अमली पदार्थविराेधी पथक-एनसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत एनसीबीच्या पथकाने २०० किलो अल्प्रझोलम जप्त केले आहे.
अल्प्रझोलमचा वापर मनोविकारासाठी लागणाऱ्या औषधांसाठी केला जातो. अल्प्रझोलमचा या रसायनांचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मनोविकार, चिंताविकारासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधात अल्प्रझोलमचा वापर माफक प्रमाणावर केला जातो. त्यासाठी अन्न, औषध प्रशासन विभागाकडून मंजुरी दिली जाते. मनोविकार, चिंताविकारातील औषधी गोळ्यात वापरण्यात येणाऱ्या अल्प्रझोलमचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण पाटील आणि त्यांचा साथीदार अभिषेक बलकवडे यांनी नाशिक येथील शिंदे गावात मॅफेड्रोन तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जुन्नर, शिरुर तालुक्यात अल्प्रझोलमची बेकायदा निर्मिती होत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने जुन्नर, शिरुर परिसरात छापा टाकून २०० किलो अल्प्रझोलम जप्त केले. एनसीबीच्या पथकाने याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण झोपेच्या गोळ्यांच्या नशेसाठी करत असल्याचे आढळून आले आहे. पुणे-मुंबईतील काही औषध विक्रेते बेकायदा अशा प्रकारच्या गोळ्यांची विक्री करतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय तसेच प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेच्या गोळ्यांची विक्री करणे बेकायदा आहे.