पुणे: राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा (एनसीएल) या संशोधन संस्थेने बायोपोलिमर नॅनो कॉटिंग असलेले वैद्यकीय श्रेणीचे विशिष्ट मास्क विकसित केले आहेत. डॉ. सय्यद दस्तगीर डॉ. महेश धारणे आणि डॉक्टर शुभांगी उंबरकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने एनसीएलने पेटेंट घेतलेल्या जीवाणूंच्या सेल्युलोजचा वापर नॅनोकॉटिंगसाठी केला आहे.एनसीएलने तयार केलेल्या मास्कची कार्यक्षमता ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा सुधारीत आहे. या संशोधनात सूक्ष्मजीव वाढीचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी सुती कापड जिवाणू सेल्युलोज द्रावण आणि नॅनो मटेरियलमध्ये बुडून ठेवण्यात आले होते. या अभ्यासात जिवाणूंची वाढ रोखण्यात आली असून फिल्टर म्हणून मास्कमध्ये महत्वपूर्ण घटकांचा वापर करण्यात आला आहे. या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी स्पन बॉण्ड पॉलीप्रोपीलीन वैद्यकीय श्रेणीच्या कपड्यांचा वापर करून जिवाणू फिल्डरेशनची कार्यक्षमता, द्राव्य घटकांच्या फिल्टरेशनची कार्यक्षमता , श्वासोच्छवास, ज्वलनशीलता अशा विविध मापदंडानुसार अभ्यास करण्यासाठी नमुना मास्क तयार केले. कोयंबतूर येथील दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटना (सिट्रा) या शासकीय मान्यताप्राप्त वैद्यकीय वस्त्रोद्योगासाठी प्रमाणित करणाऱ्या नोडल एजन्सीने या मास्कच्या नमुन्याची तपासणी केली. त्याचप्रमाणे 'अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अण्ड मटेरियल्स'च्या मास्क संरक्षक मानांकनानुसार जिवाणू फिल्टरेशन कार्यक्षमता तपासणीसाठी स्टेफीलोकोकस ऑरियस या मानवी रोगकारकाचा प्रयोग केला तेव्हा मास्कची कार्यक्षमता ९९.९ टक्के एवढी निदर्शनास आली. रुग्णांच्या रक्त आणि शरीरातील स्रावांच्या शिडकाव्यापासून हा मास्क किती बचाव करू शकतो हे पाहण्यासाठी सिट्राने घेतलेल्या चाचणी मध्ये सुद्धा हा मास्क पात्र ठरला आहे.
एनसीएलने पुण्यातील सेट लॅब इंडिया या लघु आणि मध्यम उद्योग कंपनीला या तंत्रज्ञानाचा परवाना दिला आहे. येत्या काही दिवसात सेट लॅब उत्पादन सुरू करणार असून दिवसाला पाच हजार मास्कपासून सुरुवात करून या महिनाअखेरपर्यंत एका दिवसाला एक लाख मास्क तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे,असे एनसीएलतर्फे कळविण्यात आले आहे.