पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना मराठा समाजाचा निकष वापरल्याचा आरोप करत पक्षाच्या कार्यकर्त्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र संबंधित व्यक्तीने हा पत्रात स्वतःचे नाव लिहिले नसून पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना पत्राची प्रत पाठवणार असल्याचे नमूद केले आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या होत्या. त्यात महिला, युवती, युवक, विद्यार्थी अशा विभागांचा समावेश होता. आता त्या नेमणुकांबाबत एका कार्यकर्त्याने थेट नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात माजी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, पक्षाने केलेल्या नेमणुका मराठा समाजाच्या असून अल्पसंख्यांक सेलमध्येही याच समाजाच्या व्यक्तींची नेमणूक करावी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा आहे असे समजेल. शिवाय चव्हाण यांच्या काळात एन जी ओ संस्था बळकट झाल्या आणि पक्ष संघटनेचे वाटोळे झाल्याचे म्हटले आहेत. सध्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यावरही पार्ट टाईम काम करत असल्याचा आरोप करण्यात आहे. १५ ते २० कार्यकर्त्यांना घेऊन रोज आंदोलन केल्याने सत्ता येत नसते असा टोलाही लगावला आहे. फक्त शरद पवार किंवा अजित पवार आल्यावर व्यासपीठावर बसण्यासाठी स्पर्धा असते असेही म्हटले आहे. या पत्राचा शेवट करताना यावर लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर कितीही मोठे ऑपरेशन केले तरी पक्ष संघटना कोमात गेलेली दिसेल असे म्हटले आहे.
या पत्रावर अजून तरी पक्षातून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र हे पत्र कोणी लिहिले आहे यावर दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे सोमवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमात जाणवले.