मंचर (पुणे) : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पोदेवाडी गावच्या विविध विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे गैरहजर राहिल्याने माजी सरपंचांनी सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली आहे. काही वेळातच हा संदेश डिलिट करण्यात आला असला तरी त्यामुळे तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आंबेगाव तालुक्यात संपर्क कमी असल्याचा आरोप विरोधक नेहमीच करतात. कोल्हे हे खूपच कमी वेळा आंबेगाव तालुक्यात आले आहेत. त्यांनी विकासकामे केली नसल्याचा आरोप झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचे असे झाले की पोंदेवाडी येथे विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ पार पाडला.
या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार अशोक मोहोळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हे यांची कार्यक्रमासाठी वेळ मिळाली नाही. वळसे पाटील व मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला. यामुळे नाराज झालेले गावचे माजी सरपंच, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी लगेचच समाज माध्यमात नाराजीचा संदेश प्रसारित केला.
त्यात म्हटले आहे की विद्यमान खासदारांना कार्यक्रमासाठी तीन महिन्यांपासून वेळ दिला नाही. आज शेवटी माजी खासदारांकडून उद्घाटन करून घेतले. जुने ते सोने असते. विद्यमान आहेत शूटिंगमध्ये व्यस्त, शिवाय पोंदेवाडी गावाने खासदारकीला पंचायत समिती गणांमध्ये ३५० मतांचे लीड दिले आहे. खासदार एकदाही गावात आले नाही आणि मला वाटत नाही परत त्यांना कधी वेळ भेटेल यायला म्हणून. पण जाऊ द्या आमच्या गावाचं प्रेम पक्षावर तसेच वळसे पाटील यांच्यावर १०० टक्के आहे व कायम राहणार आहे. खासदार साहेब बोलावले, पण पक्षाचे बोलावले हे ध्यानात ठेवा, असा संदेश अनिल वाळुंज यांनी समाज माध्यमात दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. मात्र काही वेळानंतर हा समाज माध्यमातील संदेश डिलिट करण्यात आला. असे असले तरीही त्याची चर्चा तालुकाभर झाली आहे.
माजी सरपंच अनिल वाळुंज म्हणाले, खासदार कोल्हे हे निवडणुकीआधी व नंतरही गावात आलेले नव्हते. कार्यक्रमासाठी ते यावेत म्हणून मी दोन-तीन वेळा फॉलोअप केला. तारीख देतो असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मार्बलवर त्यांचे नाव आवर्जून टाकले होते. तीन दिवसांपूर्वी येऊ शकणार नाही, असे खासदार कोल्हे यांनी कळविले होते. त्यामुळे मी नाराज होतो. मात्र आता त्यांनी दूरध्वनी करून लवकरच गावाला भेट देणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे माझी नाराजी दूर झाली आहे.