लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्याबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयात ज्या जनहित याचिका दाखल होतील त्याचा खर्च महापालिकेने करावा, या स्थायी समितीच्या ठरावाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या नगरविकास विभागाकडे जाणार असून, हा ठराव दफ्तरी दाखल करण्याची मागणी करणार आहे़
येत्या मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुंबईला प्रत्यक्ष जाऊन याबाबतचा निवेदन देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली़ यावेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ उपस्थित होत्या़
जगताप म्हणाले, समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे उज्ज्वल केसकर हे भाजपचे पदाधिकारी असून ते माजी नगरसेवक आहे. केसकर हे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे निकटवर्तीय आहेत. कुलकर्णी आणि महापौर मोहोळ यांच्यात वाद आहेत. यातूनच केसकर यांनी महापौर मोहोळ यांना प्रतिवादी केले आहे़ मात्र, त्यांच्या या अंतर्गत कलहाचे खापर महापालिका आयुक्तांवर सभागृहनेते फोडत असल्याचा आरोप त्यांनी केला़
--------------------------
बैठकीपूर्वी चर्चा करण्याच्या सदस्यांना सूचना
सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीत चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव मंजूर केले जात असताना, समितीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य काहीच विरोध करीत नाही, अशी चर्चा सातत्याने होत आहे. यापुढील काळात स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बैठकीतील विषयांची चर्चा करावी, असे बंधन घातल्याचे जगताप यांनी सांगितले़
---------------------
शिल्पउभारणी विरोधातही तक्रार
अंबेगाव पठार येथील क्रीडांगणाच्या ठिकाणी रामाचे शिल्प उभारण्याचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीने मान्य केला आहे. हा प्रस्ताव रद्द करावा यासाठीही नगरविकास खात्याकडे पक्षाकडून मागणी करण्यात येणार आहे़
----------------