पुणे : सुप्रिया ताई आज बढो हं तुम्हारे साथ है, या चंपाचं करायचं काय खाली डोकं वर पाय, सुप्रिया ताई अंगार है बाकी सब भंगार है, अशी घोषणाबाजी करत पुण्यातील सारसबाग येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यावरून पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने काढलेल्या मोर्च्यात बोलताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी खासदार सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दांत टीका केली होती. 'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. पुण्यातही सारसबाग येथे राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.