"फार महत्त्व देऊ नका"; जगदीश मुळीकांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 02:53 PM2024-08-26T14:53:08+5:302024-08-26T14:56:56+5:30
Ajit Pawar : भाजप नेते जगदीश मुळीक यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले
Ajit Pawar on Jagdis Mulik : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असतानाच पुण्यात महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे पाहायला मिळतंय. पुण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याला कारण ठरलं आहे वडगाव शेरीमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली. महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? असा सवाल करत मुळीक यांनी टिंगरेंना लक्ष्य केलं. त्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं.
वडगाव शेरीच्या आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झालीय. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील ३०० कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीवरुन भाजपचे सुनील टिंगरे आक्रमक झाले आहेत. वडगाव शेरीतील विकास कामांच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतला महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? असा सवाल जगदीश मुळीक यांनी केला.
"वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे!वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत! तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही," असं म्हणत
मुळीक यांनी टिंगरेंवर निशाणा साधला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. "या गोष्टीला तुम्ही फार काही महत्त्व देऊ नका. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे. तशा पद्धतीने काम सुरु आहे. जर याच्यातून कुणाचे समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी," असं अजित पवार म्हणाले.
वरचे नेते निर्णय घेतील - सुनील टिंगरे
"कार्यक्रमाची पत्रिका काढण्याचे काम प्रशासनाचे असते. त्यामुळे नियमानुसार त्यांनी ते केले. ज्यावेळी एखाद्या पक्षाचा नेता माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागतेचे बॅनर लावले जातात. मला तर असं कुठेही जाणवत नाही. जे काही आहे त्याचा निर्णय वरचे नेते घेतील आपण त्यावर कशाला भाष्य करायचं," असं आमदार सुनील टिंगरे म्हणाले.