Gram Panchayat Elections 2023: राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून, मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, अनेक ठिकाणच्या लढतींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मात्र ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यातच बारामतीत महायुतीत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि भाजप एकमेकांविरोधात मैदानात उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहेत. मतदानाला आलेल्या अजित पवार यांच्या मातोश्रींनी माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली.
पुणे जिल्ह्यामधील बारामतीच्या काटेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. यामुळे या ठिकाणची लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवारांच्या आईने मुलाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले.
माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते
माध्यमांशी बोलताना आशा पवार म्हणाल्या की, मी १९५७ पासून काटेवाडीत मतदान करते. पूर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. तसे आई म्हणून माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. माझे वय आता ८४ झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मला अजित पवारांना मुख्यमंत्री झालेले बघायला आवडेल. लोकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यामुळे आता ‘दादा’ने मुख्यमंत्री व्हावे, हीच आपली इच्छा राहिली आहे, असे आशा पवार यांनी सांगितले.
दरम्यान, गावातील लोक आपल्यासोबतच आहे. आमचा विजय निश्चित आहे, असे आशा पवार यांनी सांगितले. मी काटेवाडीत आले तेव्हा गावात काहीच नव्हते. त्यानंतर सूनबाईने गावासाठी काम केले. आता खूप बदल झाले, असेही त्या म्हणाल्या. दुसरीकडे, काटेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच विजय होईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी मतदानावेळी व्यक्त केला आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीवर अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे.