राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 04:59 PM2024-01-06T16:59:24+5:302024-01-06T17:03:49+5:30

जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीत तणाव निर्माण झाला आहे का, याबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ncp Ajit Pawar reacts to cm eknath shinde shivsena rally in Shirur Lok Sabha constituency | राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. कोण किती जागा लढवणार, यावरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू असताना आता महायुतीतही  वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिरूरमधून आपल्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बळ दिलं आहे. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ही जागा पार्थ पवार यांच्यासाठी सोडली जावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीत तणाव निर्माण झाला आहे का, याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर आज पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ शिंदे यांच्या शिरूरमधील मेळाव्यावरून सुरू झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अजित पवार यांनी सावध भूमिका घेत म्हटलं आहे की, "भाजपचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे आम्ही सर्व वरिष्ठ आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आम्ही सगळेजण एकत्रित बसून जागावाटपाबद्दल निर्णय घेऊ. वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळे सहकारी आपआपली भूमिका मांडत असतात. मात्र महायुतीत म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे महायुतीच्या जास्तीत जागा जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे," असं अजित पवार म्हणाले.

शरद मोहोळ हत्याकांडावर काय म्हणाले अजित पवार?

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काल दिवसाढवळ्या हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली. जुन्या वादातून मोहोळ याच्या सहकाऱ्यांनीच त्याची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. मात्र या घटनेनंतर शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेबद्दल अजित पवार यांनी भाष्य केलं असून ते म्हणाले की, "याप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. याबाबतचा आणखी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्याशिवाय मी यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती लोकांसमोर आणली जाईल," असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
 

Web Title: ncp Ajit Pawar reacts to cm eknath shinde shivsena rally in Shirur Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.