पुणे:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये 21 पैकी 19 जागा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेल जिंकून बाजी मारली. तर भाजपचा जिल्हा बँकेत प्रथमच शिरकाव झाला असून दोन जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. बँका पतसंस्था या क वर्ग गटामध्ये अटीतटीची लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांच्यावर भाजपचे प्रदीप कंद यांनी 14 मतांनी मात केली.
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सात जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. विद्यमान संचालक आत्माराम कलाटे. मुळशी, प्रकाश म्हस्के. हवेली. तज्ञ संचालक सुरेश घुले, हवेली यांना पराभव पत्करावा लागला.
मुळशी तालुक्यात व विद्यमान संचालक आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील चांदेरे यांच्यात लढत झाली चांदेरे 27 मते घेऊन विजयी झाले तर कलाटे यांना 18 मते मिळाली. हवेली तालुक्यातील जोरदार रस्सीखेच झाली राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मैत्रीपूर्ण लढत घोषित केली होती यामध्ये विकासनाना दांगट 73 मते घेऊन विजय झाले. तर प्रकाश म्हस्के यांना 58 मते मिळाली. शिरूर तालुक्यामध्ये आमदार अशोक पवार यांचा एकतर्फी विजय झाला. पवार यांना 109 तर त्यांचे प्रतिस्पर्धी आबासाहेब चव्हाण यांना 21 मते मिळाली.
बँका पतसंस्थांसाठी असलेल्या क वर्ग गटामध्ये भाजपचे प्रदिप विद्याधर कंद यांनी जोरदार मुसंडी मारून विजय मिळवला. कांदा यांना 405 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांना 391 मते मिळाली. इतर संस्थांच्या ड वर्ग गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला दुर्गाडे यांना 948 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दादासाहेब फराटे यांना 265 मते मिळाली.
महिला प्रवर्गातील दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे विजयी झाल्या बुट्टे पाटील यांना 2749 तर जागडे यांना 2488 मते मिळाली. भाजपच्या आशा बुचके पराभूत झाल्या त्यांना 933 मध्ये मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र वाटप केले. जिल्हा बँकेतील संचालकांचे पक्षीय बलाबल या प्रमाणे-राष्ट्रवादी काँग्रेस.... अजित पवार( बारामती ) दिलीप वळसे पाटील( आंबेगाव) रमेश थोरात (दौंड) अशोक पवार (शिरूर) दिलीप मोहिते (खेड ) संजय काळे (जुन्नर) माऊली दाभाडे (मावळ) सुनील चांदेरे (मुळशी) रेवणनाथ दारवटकर (वेल्हे.) दत्तात्रेय भरणे (पणन प्रक्रिया संस्था ब गट) प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे (ड गट) संभाजी होळकर (ओबीसी ) दत्तात्रेय येळे (भटक्या विमुक्त जाती.) प्रवीण शिंदे (अनुसूचित जाती.) पूजा बुट्टेपाटील (महिला) निर्मला जागडे( महिला)
काँग्रेस.... संग्राम थोपटे (भोर) संजय जगताप (पुरंदर)
भाजप.... अप्पासाहेब जगदाळे (इंदापूर) प्रदीप कंद (बँका पतसंस्था)
तीन दादांचा जयजयकार.... बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना अल्पबचत भवनात या बाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती या गर्दी मध्ये अजितदादा...आढळराव दादा..आणि प्रदीपदादा..अशा घोषणांचे जोरदार युद्ध रंगले. गुलाल आणि भंडाऱ्याची तुफान उधळण झाली या घोषणाबाजीत पोलिसांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला.