अजित पवार यांचा नामोल्लेख न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 11:54 AM2020-07-10T11:54:34+5:302020-07-10T11:55:02+5:30
अजित पवार यांनी पुणे महापालिकेला 312 कोटी रुपये मिळवून दिले.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, शासनाकडून पुणे महापालिकेला ३१२ कोटी रुपये मिळवून दिले. परंतु, याची माहिती देताना स्थायी समितीच्या अध्यक्षांनी पवार यांच्या नावाचा साधा उल्लेख देखील केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, कोरोना आपत्तीच्या काळात कुठलेही राजकारण न करता, आर्थिक संकटात सापडलेल्या पुणे महापालिकेस मदत करण्यासाठी अजित पवार पुढे आले. कोरोनामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्याने महापालिकेचे आर्थिक मार्ग बंद झाले आहेत. अशावेळी महापालिकेला राज्य सरकार कडून जीएसटीचे ३१२ कोटी रुपये मिळाले असल्याने खुप मोठा दिलासा मिळाला आहे . परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. रासने यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पालकमंत्री यांचे नाव घेणे आवश्यक होते, अशी नाराजी चांदेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त केली .
पालकमंत्री अजित पवार यांनी महापौर हे अतिशय चांगले काम करत आहे, म्हणून महापौर यांचे मनापासून कौतुक केले. अशावेळी कोणतेही प्रकारचे राजकारण न करता रासने यांनीही मनाचा मोठेपणा दाखविला असता तर खूप बरे वाटले असते असेही चांदेरे म्हणाले.