पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप 'विकासाची पोलखोल' ही स्पर्धा जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सत्ताधारी भाजपने उडी घेत महाविकास आघाडी सरकारला आव्हान केले आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील अशाच प्रकाराची घोषणा केली असून राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव 'विकासकाम दाखवा' ही स्पर्धा अयोपजित केली आहे. पहिल्या तीन जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून होणाऱ्या आरोप - प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार 'होर्डिंग वॉर' देखील पाहायला मिळाले होते. मात्र, आता महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ''विकासाची पोलखोल स्पर्धा" आयोजित केली. तर सत्ताधारी भाजपने ''विकासकाम दाखवा या'' स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. “राज्यात मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प, स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हब, चांदणी चौक बहुउद्देशीय वाहतुक प्रकल्प, बस खरेदी, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी विकासनिधी अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली. भाजपचे सरकार सत्तेत असताना खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहराचा विकास खुंटला होता,” असा आरोप मुळीक यांनी केलाय.
स्पर्धेची उत्तरे ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत
“महविकास आघाडी सरकारला जनतेच्या हिताचा कोणताच घेता आला नाही. गोंधळलेल्या सरकारला घेतलेले निर्णय परत घेण्याची नामुष्की ओढवली. विकासकामांच्या नावाने हातात भोपळा आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच भीतीने राष्ट्रवादीची नौटंकी सुरू आहे. याला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची उत्तरे ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत. योग्य व समाधानकारक उत्तर देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे,” असेही मुळीक यांनी सांगितले.