पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असून, माईंच्या मुलांसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर अनेक स्तरातील मान्यवर मंडळींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभे केलेले सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सिंधुताईंच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले, त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करत त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होते. सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रिय सिंधुताई, तुम्हाला श्रद्धांजली कशी वाहु?
विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही सिंधुताईंना श्रद्धांजली वाहताना, प्रिय सिंधुताई , तुम्हाला श्रद्धांजली कशी वाहु? तुम्ही केलेल्या अनाथ मुलांचे काम चिरंतन आहे. खुप प्रतिकुल अनुभव येईनही तुम्ही चैतन्य व प्रेमाची स्नेहगंगा होता.भरल्या अंतःकरणाने तुमचा निरोप घेते. तुम्हाला अखेरचा नमस्कार, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सिंधुताईंच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी
ज्येष्ठ समाजसेविका आणि हजारो अनाथ मुलांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सिंधुताईंना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
अनाथ,दु:खी,कष्टी जनांच्या आयुष्याला आधार दिला
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. अतिशय खडतर असे आयुष्य त्या जगल्या. पण या संघर्षातून त्यांनी अनाथ,दु:खी,कष्टी जनांच्या आयुष्याला आधार दिला.त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.