Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर झाले. यामधून पक्षाचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होणे, शरद पवार यांचा राजीनामा यांसह अनेक मुद्द्यांवर मोठे गौप्यस्फोट केले. तसेच अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर लढणार याबाबत काही स्पष्ट संकेत दिले. अजितदादा गटाने केलेल्या दावे, आरोप आणि टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
कोणी वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही आम्ही विचारांशी बांधलो गेलो आहोत, आम्ही संधीसाधू नाही, हे तुम्ही इथे येऊन दाखवून दिले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही कुणाच्या तिकिटावर निवडून आला, तुमची खूण काय होती, तुम्ही कोणाचा फोटो वापरला, तुमचा कार्यक्रम काय होता आणि आज तुम्ही कुठे गेलात? याचा विचार सामान्य माणूस करत असतो, या शब्दांत शरद पवार यांनी पलटवार केला. मी जर पुस्तक लिहिले तर मालिकाच निघेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते.
प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट पाहतो, म्हणजे ज्ञानात भर पडेल
प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांवर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी त्यांच्या पुस्तकाची वाट बघतोय. लोक पक्ष सोडून का जातात, याच्यावर त्यांनी एखादा चॅप्टर लिहावा. त्यांचं घर किती मजल्यांचं आहे आणि ईडी का ताब्यात घेतेय तोही चॅप्टर त्यांनी घ्यावा म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.
दरम्यान, आम्हाला जी लोकांनी मते दिली ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. भाजप आणि त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत जाणे सुसंगत नव्हते. त्यामुळे मी त्या निर्णयाच्या बाजूने नव्हतो, असे शरद पवार यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक ३ ते ४ महिन्यांवर आली आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे जे मतदारसंघ आपण ठरवले आहेत, त्यासाठी तयारी करून ही जागा आम्ही घेणारच असा निर्धार करून तुम्ही पुढची पावले टाकली पाहिजे, असे शरद पवार यांनी नमूद केले.