पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑगस्ट २०१८ पासून ते शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली असून तुपे यांचा राजीनामा ही त्याची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. शहराध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू करण्यात आले आहे.
दहा वर्षांपूर्वी काँग्रेसकडून महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून आणली. त्यानंतर संघटनात्मक ताकदही वाढली होती. मात्र, मोदी लाटेत २०१७ साली राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेली. भारतीय जनता पक्ष ९८ नगरसेवकांसह भाजपाने पालिकेची सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेतील तत्कालीन गटनेते चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने शहरातील हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघ भाजपाकडून खेचून आणले. आमदार झालेल्या तुपे यांनी अन्य व्यक्तीला कामात संधी मिळावी याकरिता शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देतानाच काही नावाची शिफारसही त्यांनी केली होती.
शहाराध्यक्ष बदलाचा निर्णय दीड वर्ष लांबणीवर पडला होता. तुपे यांच्या राजीनाम्यानंतर हे इच्छुक पुन्हा कामाला लागले आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक दीपक मानकर, पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम, प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख आदींचा यामध्ये समावेश आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
-----
२०१७ साली पालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेत असलेला राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकांवर बसला. गेल्या पाच वर्षांत भाजपाला प्रकल्प आणि विकासमकामे पूर्ण करण्यात आलेले अपयश पाहता राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्याची संधी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे.
----
शहराध्यक्षपदी एसी, ओबीसी की ओपन?
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी आजी माजी दिग्गज आणि पालिकेतील महत्त्वाची पदे भूषविलेले नगरसेवक इच्छुक आहेत. यामध्ये एससी, ओबीसी आणि ओपन अशा तीनही गटांतील इच्छुकांचा समावेश आहे. त्यामुळे शहराध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.
----
खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी सलग आठ वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले होते. महिलाही पक्षाची धुरा सांभाळू शकतात. त्यामुळे शहाराध्यक्षपद महिलेला मिळावे, अशी अपेक्षाही काही महिला नगरसेविकांनी व्यक्त केली आहे.