Video: छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:12 PM2024-02-08T12:12:39+5:302024-02-08T12:14:22+5:30
पुण्यातील कार्यालयावरचे नाव उतरवले, घड्याळही काढून टाकले; कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘बंडखोरांना धडा शिकवू,’ असा निर्धार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या डेंगळे पूल येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावरचे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बुधवारी (दि. ७) सायंकाळी काढून टाकण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वत:च्या उपस्थितीत ही कृती करून घेतली. यावेळी नाव आणि चिन्ह काढताना प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर झाले. हि कृती घडत असताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना आहे...! २४ वर्षे ८ महिने जे चिन्ह घेऊन लढलो ते चिन्ह काढून टाकताना यातना होतात, पण या शतकातील एका महान लोकनेत्याच्या कठीण काळात मी कार्यकर्ता म्हणून सोबत आहे याचं कायम समाधान राहील. असं ते म्हणाले आहेत. तत्पूर्वी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘बंडखोरांना धडा शिकवू,’ असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले हाेते. त्याची काेनशिलाही काढून टाकण्यात आली.
जगताप यांच्यासह पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, मनाली भिलारे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडल्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, कधी केली, पक्ष कसा वाढवला, त्यासाठी किती परिश्रम घेतले, आजारपण असतानाही पक्षाची कशी काळजी घेतली, या सर्व गोष्टींची संपूर्ण देशाला माहिती आहे, असे जगताप यांनी सांगितले. बंडखोरांनी काय केले, हेही राज्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे तीच जनता आता यांना मतपेटीतून धडा शिकवले, असे ते म्हणाले.
हा निवडणूक आयोग नाही तर फसवणूक आयोग आहे, अशी टीका काकडे यांनी केली. पक्षाबरोबर, शरद पवार यांच्याबरोबर राहिले तेच खरे निष्ठावान आहेत. बाकीच्यांना सत्तेची भुरळ पडली. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. यापुढेही अनेक प्रयोग केले जातील, मात्र त्याला शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते बळी पडणार नाहीत, आम्ही पवार यांच्याबरोबरच राहू, असेही काकडे यांनी सांगितले. बंडखोरांचा निषेध करत त्यांच्या घोषणांनी कार्यालय दणाणून सोडले.