पुणे : ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या पुस्तकाचा राज्यातील विविध ठिकाणी निषेध केला जात असून आज पुण्यातील लाल महाल समाेर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून या पुस्तकाचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. तसेच हे पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे आदी उपस्थित हाेते.
भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या जय भगवान गाेयल लिखीत ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकामध्ये नरेंद्र माेदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. या पुस्तकाचा आज राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निषेध करण्यात आला. पुण्यातील लाल महल चाैकात हे आंदेलन करण्यात आले. या आंदाेलनाता भाजपाच्या विराेधात घाेषणाबाजी करण्यात आली. त्याचबराेबर हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची देखील मागणी करण्यात आली. ''माेदी सरकार हाय हाय'' अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बाेलताना खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ''भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे. यातून महाराजांना नरेंद्र माेदींच्या बराेबर आणण्याचा प्रयत्न केला जाताेय, त्याचा आम्ही निषेध करताे. माेदींची किंचितही महाराजांशी बराेबरी हाेऊ शकत नाही. हे पुस्तक म्हणजे शिवभक्तांचा अपमान आहे. भाजपाला याबाबत माफी मागावी लागेल.''