इंदापूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी, सोसायटी तसेच शासकीय कार्यालये, मंदिरे, शाळा येथील स्वच्छता नगर परिषदेने तत्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत शिताप यांनी लेखी पत्राद्वारे इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे गुरुवार ( दि. १९ ) रोजी केली आहे.
यासंदर्भात, नगरसेवक प्रशांत शिताप यांनी दिलेल्या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, इंदापूर शहरातील बस स्थानक, जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी दवाखाना, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व इतर शासकीय प्रशासकीय कार्यालय यामध्ये तालुक्यातील नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच, लहान-मोठ्या रहिवाशी सोसायट्यांमध्ये असणाऱ्या मोकळ्या मैदानात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे गवत वाढलेले आहे. कचरा वाढलेला आहे. या ठिकाणी सापाचे वास्तव्य वाढत आहेत. रहिवासी सोसायटीमधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक चित्र निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करता, ठिकठिकाणी पडलेला कचरा साफ होणे गरजेचे आहे. काटेरी झुडपे काढणे गरजेचे आहे. परंतु सफाई ठेकेदार खासगी जागा आहे हे कारण दाखवून, स्वच्छता करण्यास नकार देत आहेत. तसेच त्यामुळेच नगरपालिकेने कंत्राटी ठेकेदारांकडून अथवा नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून संबंधित परिसर चकाचक स्वच्छ करून घ्यावेत अशी अपेक्षा नगरसेवक प्रशांत शिताप यांनी व्यक्त केली आहे.
१८ इंदापूर शिताप