राष्ट्रवादीला 'बालेकिल्ल्यात'च मिळेना शहराध्यक्षपदासाठी 'सक्षम' नेतृत्व! वर्षभरापासून पद रिक्त
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: November 10, 2020 04:41 PM2020-11-10T16:41:00+5:302020-11-10T17:02:20+5:30
आमदार चेतन तुपेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला शहराध्यक्ष पदासाठी सक्षम नेताच मिळालेला नाही...
पुणे : पुणेराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण २०१४ सालापासून भाजपने या बालेकिल्ल्यालाच जोरदार सुरुंग लावला. त्यानंतर भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. पण २०१९ साली राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी उभारीच मिळाली आहे. त्यातच अजित पवारांकडे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री असे दोन महत्वाचे पदे आली. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीने आपल्या ढासळलेल्या बालेकिल्ल्याची पुनर्बांधणी सुरु केली आहे. परंतु, याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्षपद जवळपास गेल्या एक वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे आता पक्षातंर्गतच कुजबुज सुरु झालेली आहे.
आमदार चेतन तुपेंनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला शहराध्यक्ष पदासाठी सक्षम नेताच मिळालेला नाही. पक्षाकडे तुपेंनंतर या पदासाठी चार ते पाच नावे आली होती. मात्र त्याबाबत पक्ष नेतृत्वाने आजपर्यंत कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या नावांवर पक्षश्रेष्ठी समाधानी नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, आता चेतन तुपेंनंतरचा शहराध्यक्ष पदाचा पुढचा वारसदार केव्हा ठरणार किंवा पक्षाला सक्षम असा शहराध्यक्ष केव्हा लाभणार याचीच कुजबुज राजकीय वर्तुळासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतच सुरु आहे.
२०१८ साली ऑगस्ट महिन्यात तत्कालीन शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने २०१९ सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला प्रत्येकी २ जागा मिळवता आल्या. पण स्वतः तुपे यांची हडपसर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आणि त्यांनी काही दिवसातच पक्षातील नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे असे म्हणत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर आजतागायत तुपे यांच्यानंतर या पदाची धुरा पक्षनेतृत्वाकडून उभा पदाचा दुसऱ्या पदाचा विचार करण्यात आलेला नाही. पण आगामी निवडणूक लक्षात घेता हे पद जास्त काळ रिक्त ठेवणे फायद्याचे ठरणार नाही.
भाजपने २०१४ सालापासून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली आहे. तसेच लोकसभा, विधानसभा घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील बहुमताने सत्ता काबीज केली होती. मात्र मागच्या वर्षी झालेल्या राज्यातील सत्तांतरामुळे आता गणिते बदलत आहे. तसेच नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात महापलिकेतील सत्ताधारी कमी पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये जर इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला काही निर्णय घेणे गरजेचे आहे.
अजित पवारांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी सुरु केली आहे. तसेच स्थानिक नेत्यांना व कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढवण्याची सूचना देखील केली आहे. पण हे सर्व सुरु असताना वर्षभरापासून रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर काहीच निर्णय घेतला जात नाही. खरंतर अजित पवार झट की पट निर्णयासाठी ओळखले जातात. पण त्यांच्याकडूनही या महत्वाच्या पदाकडे का दुर्लक्ष केले जात आहे की अजून योग्य उमेदवाराचा शोधच संपलेला नाही हे स्थानिक नेत्यांना व कार्यकर्त्यांना समजायला तयार नाही.
नवीन शहराध्यक्षासाठी आगामी काळ हा कसोटीचा असणार आहे. तसेच त्याला महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर पक्षबांधणी, बंडखोरी, नवीन संकल्पना, नाराजी नाट्य, जनसंपर्क यांसारख्या विविध पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. त्यामुळे जेवढा जास्त लवकर या पदाचा निर्णय होईल तितके राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार व अजित पवार यांच्याकडून कोणत्या सक्षम नेत्याच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडते हे पाहणे येणाऱ्या काळात औत्सुक्याचे असणार आहे.