बारामती बँक निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी अपयशी; १३ जागांसाठी लढत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 07:10 PM2021-12-08T19:10:22+5:302021-12-08T19:10:58+5:30
दरम्यान निवडणुकीसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
बारामती: बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. १५ जागांपैकी दोन जागा बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले. मात्र, १३ जागांसाठी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधितांशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने ही चर्चा अपयशी ठरल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. विजय भिसे यांनी खुल्या प्रवर्गासह अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये आपला अर्ज कायम ठेवला आहे. तसेच त्यांची कन्या डॉ. प्रतीक्षा भिसे यांचा अर्ज देखील महिला प्रवर्गात कायम राहिला आहे. त्यामुळे बारामती सहकारी बँकेच्यानिवडणूकीची १३ जागांसाठी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे उमेदवार रोहित घनवट हे इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून तर उद्धव गावडे यांचा भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. मात्र डॉ. विजय भिसे यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी निवडणूक लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान निवडणुकीसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.