पौड : राज्य शासनाचे शिक्षक बदली धोरण व त्याची चुकीची अंमलबजावणी झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी मुळशी तालुक्यातील ३९ शाळांना तात्पुरत्या स्वरूपाचे शिक्षक मिळाल्याने शासनाच्या शिक्षण विभागाच्या निषेधार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पौड पंचायत समितीच्या आवारात रस्त्यावरच शाळा भरविण्याचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मुळशी जि.प.च्या माजी सभापती सविता दगडे, माजी गटनेते शांताराम इंगवले, सुभाष अमराळे, विद्यमान जि.प. सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, मुळशी पंचायत समितीच्या सभापती कोमल साखरे, सदस्या राधिका कोंढरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनात कायमस्वरूपी शिक्षक न मिळालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या वेळी पौड पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे म्हणाले, की शिक्षक बदलीचे सुगम व दुर्गम पद्धतीचे बदली धोरण योग्य आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने त्याची होणारी अंमलबजावणी मात्र चुकीची आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, यापूर्वीच्या राजकीय इतिहासात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने अशा चुकीच्या पद्धतीच्या धोरणाचा अवलंब केलेला नव्हता. परंतु, सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकट्या मुळशीतील ३९ शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे रस्त्यावर शाळा भरविण्याचे आंदोलन केले आहे. राज्य शासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
चुकीच्या शिक्षक बदलीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीने भरविली रस्त्यावर शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:27 PM
सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकट्या मुळशीतील ३९ शाळा बंद करण्याची वेळ आली आहे....
ठळक मुद्देराज्य शासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनया आंदोलनात कायमस्वरूपी शिक्षक न मिळालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग