पुणे : २४ तास पाणी योजनेतील राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या टाक्यांचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांकडे केली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने टाक्यांच्या निविदा प्रकरणाची चौकशी करण्याचा व तोपर्यंत बांधकामाला स्थगिती देण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला दिला आहे.भारतीय जनता पक्षामधील गटबाजीचा या योजनेवर परिणाम होत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी केला. महापालिकेत सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेच तत्कालीन विरोधक असलेल्या भारतीय जनता पार्टीचे साह्य घेत या योजनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर योजनेच्या खर्चातील पालिकेचा सहभाग म्हणून ८२ टाक्यांच्या बांधकामांची निविदाही काढली. नंतर मात्र केंद्र व राज्य सरकारचा निधी नाही म्हणून योजनेतंर्गत असलेल्या शहरातील प्रत्येक नळजोडाला मीटर बसवण्याला विरोध केला. चेतन तुपे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांनी याचीच री ओढली. निवडणूक प्रचारात मंत्री बापट यांनीच २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांना त्याचा विसर पडला आहे का, असा सवाल त्यांनी केला. मनसेचे उपाध्यक्ष जयराज लांडगे यांनीही टाक्यांचे काम त्वरित सुरू करावे, नागरिकांच्या हिताच्या योजना बंद पडू देऊ नयेत अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
टाक्यांच्या बांधकामांसाठी राष्ट्रवादी आग्रही
By admin | Published: March 24, 2017 4:22 AM