पुणेकरांना शनिवारी जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह वरूणराजाने (दि.८) चांगलेच झोडपले. मान्सूनने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला असून, राज्यातही पुढील दोन दिवसांत मजल मारणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. शनिवारी पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यात पावसाने मजल मारली.
पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचा जोर असल्याने रस्ते पाण्याखाली गेले. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये ५ वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे सिद्ध झालं असंही म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी पुण्यातील पावसावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या."
"अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!" असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पुढील दोन दिवसांत मान्सून इतर भागात धडक मारेल आणि राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.