पिंपरी: शिवसेनेतून बाहेर पडलेले आताचे आमदार युतीच्या सत्ताकाळात राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भर सभेत राजीनामा दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात अशा पद्धतीने कोणीही राजीनामे खिशात घेऊन कोणी फिरले का, कोणी राजीनामा दिला का, असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिंचवड येथे झालेल्या संवाद सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी अर्थमंत्री असताना सर्वांना निधी दिला. मात्र, तरीही बदनामी केली जाते. शिवसेना, भाजप युतीच्या सत्ताकाळात काही आमदार खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. महाविकास आघाडीच्या काळात एकाही आमदार राजीनामा घेऊन फिरला नाही. मात्र, मुख्यमंत्री पदाची संधी मिळतेय असे पाहूनच एकनाथ शिंदे आणि इतर आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्याकडे बहुमत आहे. तरीही मंत्रीमंडळ विस्तार होत नाही.
ते दोघेही टिकोजीराव...
काही अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय टिकोजीराव असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. हे चुकीचे आहे, असे पवार म्हणाले.
‘ते’ मिस्टर इंडिया नाहीत...
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर आला आहे. तरीही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यांच्या ठिकाणी ध्वजावंदन कोण करणार, असा प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मुंबईत तर उपमुख्यमंत्री नागपूर येथे ध्वजारोहण करतील. इतर ठिकाणचे काय, एकाचवेळी सर्व ठिकाणी जाण्यासाठी ते दोघेही मिस्टर इंडिया नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे
देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोही राबविण्यात येत आहे. कोणत्या एका पक्षाचा तो कार्यक्रम नाही. त्यामुळे त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले.
निवडणूक कधीही होऊ द्या, त्यासाठी तयार रहा...
सत्तांतर होत राहतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. सत्ता गेली म्हणून निराश व्हायचे नाही. निवडणुका पुढे गेल्याची चर्चा आहे. मात्र, निवडणुका कधीही होऊ द्या, त्यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तयार रहावे, असा सल्ला पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.