NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून सातारा लोकसभा मतदारसंघावरून निर्माण झालेला तिढाही सुटण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्याची जागा भाजपच्या उदयनराजे भोसले यांना सोडून त्याबदल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ हे आज पुण्यात अजित पवारांची भेट घेणार असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जागावाटपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा आणि नाशिकच्या जागेची अदलाबदल करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत तथ्य आहे का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत. काल आमच्या पक्षाची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मात्र छगन भुजबळ हे परवा आजारी होते आणि काल ते दुसऱ्या कामामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे आज ते मला भेटण्यासाठी येत आहेत. जागावाटपावर आम्ही उद्याच आमची भूमिका जाहीर करू," असं अजित पवारांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून जातील, यासाठी आम्ही आखणी करतोय, प्रयत्न करतोय आणि लोकांना आवाहन करतोय, असंही अजित पवार म्हणाले.
साताऱ्याच्या बदल्यात का सुरू आहे नाशिकची चर्चा?
मागील लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र भाजपही उदयनराजेंसाठी ही जागा सुटावी यासाठी आग्रही असून साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांना उत्तर महाराष्ट्रातील जागा सोडली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
आमची हक्काची साताऱ्याची जागा तुम्हाला हवी असेल तर आम्हाला नाशिकची जागा द्या, अशी मागणी अजित पवारांच्या पक्षाने केल्याचे समजते. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हेमंत गोडसे हे मागील दोन टर्मपासून खासदार आहेत. मात्र या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपकडूनही नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. नाशिकवरून आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीनेही या जागेची मागणी केली असून याबाबत नक्की काय निर्णय घेतला जातो, हे उद्या स्पष्ट होणार आहे.