पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन कार्यक्रमाची चर्चा झाली ती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या न झालेल्या भाषणामुळे. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवार बोलतील, अशी शक्यता होती. मात्र पाटील यांच्या भाषणानंतर राज्यपाल रमेश बैस बोलायला उभे राहिले. तसंच राज्यपालांच्या भाषणानंतर थेट आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषणच न झाल्याने कार्यक्रमस्थळी चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. पुण्यातील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते. विविध व्यासपीठांवर केल्या जाणाऱ्या भाषणात आपल्या खुमासदार टोलेबाजीसाठी अजित पवार ओळखले जातात. मात्र त्यांनी आजच्या कार्यक्रमात भाषण न केल्याने त्यांना बोलू दिलं नाही की त्यांनीच बोलणं टाळलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाषणात काय म्हणाले राज्यपाल?
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, "नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचं आयोजन व्हावं. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाचप्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील," असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटलांचंही भाषण
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मुंबई येथे १९७९ आणि २००६ मध्ये पुण्याला हे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत," अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.