“राज ठाकरे वारंवार पुरंदरेंचं नाव घेतात, ज्या मेहेंदळेंचं नाव घेत त्यांनी प्रतापराव गुजरांचा इतिहास सांगितला ते मेहेंदळे बोललेलेच नाहीत हे मी जाणीवपूर्वक सांगतो. जयसिंगराव पवारांनीही बाहेर येऊन स्पष्टीकरण दिलं. जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रात राज ठाकरे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं.
“कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नाही. आमची काँग्रेस संस्कृती आहे ती सर्व जाती-पाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती आहे. त्या संस्कृतीत आमचा जन्म आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं आव्हाड म्हणाले. “भोंगा कोणी काढला? ते ध्रुवीकरण होतं. त्यामुळे सर्व काकड आरत्याही बंद झाल्या. उगाच कारण नसताना वेडेवाकडे आरोप करू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.भारत जोडोची स्तुतीस्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान असलेल्या काँग्रेसची विचारधारा प्रेमाची, आपलेपणाची आहे. राहुल गांधी आपल्या परिवाराचा तोच वारसा पदयात्रेतून चालवत आहे. द्वेषाने विखरत असलेल्या भारताला जोडण्याचे काम ते करत असल्याचं वक्तव्य त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस व त्यांनी पंतप्रधानपद नाकारल्याचे स्मरण म्हणून आयोजित १८ व्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान केलं.
"काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर बोललेच पाहिजे म्हणून आलो. देशाच्या सद्भावनेचे प्रतिक असलेल्या महात्मा गांधींजींना मारणाऱ्याचे होत असलेले उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे,” असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.