अजित पवारांचा आदेश राष्ट्रवादीच्याच नेत्याने धुडकावला; 'बर्थ डे'ला पुण्यात तमाशा रंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:01 PM2021-04-01T17:01:15+5:302021-04-01T17:07:36+5:30
बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम रंगला होता.आणि तो एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अरण्यातकार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.
पुणे: पुणे शहरात कोरोना झपाट्याने रुग्ण वाढ होत असल्याने सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुण्यात घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला होता. असे असताना राजरोसपणे बालगंधर्व रंगमंदिरात एक लावणीचा कार्यक्रम रंगला होता. एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसे कसबा अध्यक्ष गणेश भोकरेंनी केला आहे.
पुणे शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. राजकारण्यांनी कोणताही कार्यक्रम घेवु नये तसेच त्याला हजेरी लावु नये असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. असे असताना बालगंधर्व रंगमंदिरात थेट तमाशा रंगला होता. रंगमंदिरात कमी लोकांची उपस्थिती असली तरी देखील अनेक लोक या कार्यक्रमाला हजर होते.
या कार्यक्रमाची कुणकुण लागल्यावर मनसे नेते तिथे पोहोचले आणि त्यानी हा कार्यक्रम बंद पाडला. “ कोरोना वाढत असताना असा कार्यक्रम घेतला जातोय. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा वाढदिवस इथे साजरा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदेश त्यांनी धुडकावला आहे” असा आरोप करत कारवाईची मागणी मनसेचे कसबा अध्यक्ष गणेश भोकरेंनी केली.