बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नाही; फडणवीसांच्या बॅनरवरून रोहित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:56 PM2021-07-23T12:56:16+5:302021-07-23T12:58:28+5:30
फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात लावण्यात आले होते बॅनर. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी केली होती बॅनरबाजी.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. परंतु पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिलं होतं. पुणे शहर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा 'विकासपुरुष' आणि नव्या पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. नंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आणि अजित पवारांचा 'कारभारी लयभारी' असा बॅनर लावण्यात आला होता. देवेद्र फडणवीस यांच्या बॅनरवरून रोहित पवारांनी आता टोला लगावला आहे.
"बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये," असं म्हणत रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला.
बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये.https://t.co/CoIe9ksrRcpic.twitter.com/9apP4VdG0m
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2021
अमोल मिटकरींनीही केली होती टीका
पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनरबाजी केली. तसेच त्यांचा पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करण्यात आला होता. याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसावर ट्विटद्वारे निशाणा साधला होता. त्यात त्यांनी आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं,यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त..अशा शब्दात निशाणा साधला होता.