पुणे: आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भुसावळातील भाजपाच्या नगराध्यक्षांसह २१ नगरसेवक तसेच सावदा ता. रावेर येथील नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह आठ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये केला आहे.
भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नुकत्याच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाचे संकट मोचक संकटात आले, असा टोला लगावत भाजपाची मदमस्त सत्तेची सूज हळूहळू वसरत आहे, असा टीका रुपाली पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, भुसावळ येथे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा झाला. त्यात हा प्रवेश सोहळा झाला. याशिवाय अनेक ग्रामपंचायत सदस्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे हे नगरसेवक माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.