देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला इंधन कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०४ रुपयांची वाढ केली होती. परंतू घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीला हातही लावला नव्हता. परंतू सातव्या दिवशीच कंपन्यांनी सामान्यांना जोराचा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महागाईचा भोंगा वाजला ५० रुपयाने गॅस वाढला, असं रुपाली पाटील म्हणाल्या. तसेच चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे, गॅसमध्येच भरमसाठ वाढ झाली. पुन्हा चुलीकडे जावं लागणार, पोटाचा प्रश्न आहे ना, असं म्हणत रुपाली पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढून २३५५ रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी १ एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर २६८.५० रुपयांनी वाढले होते. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच अचानक मिटिंग घेत रेपो रेट वाढविले होते. यामुळे लोकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. त्यातच आता गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढणार आहे.