पुणे: वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदोलन केले. जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अचानक पोहोचले. रात्री ११ वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलने करुनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून घेण्याचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, विद्यार्थी शिष्टमंडळ बैठकीसाठी जाणार आहे. मात्र, एमपीएससी जोपर्यंत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकानी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांत बैठक करण्याचे शरद पवारांचे आश्वासन
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या कुलगुरूंनी मला पत्र पाठवून त्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या योग्य असल्याचे सांगितले आहे. अशक्य काही नाही आपण मार्ग काढू शकतो. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार आणि मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणे गरजेचे आहे. इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी संपर्क केला असता बैठक घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मी स्वतः तुमच्याबरोबर असेन. आयोगाचे अधिकारी, विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी या बैठकीला असतील. तुमच्यावतीने कोण बैठकीला येणार त्यांची नावे द्यावीत, असे शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितले.
दरम्यान, या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागेल. मुख्यमंत्र्यांसोबत येत्या दोन दिवसांत बैठक करण्याची जबाबदारी मी घेतो. यावर तोडगा काढायचा असेल, तर सरकारशी बोलावे लागेल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. पण विद्यार्थ्यांनी अद्याप आपले आंदोलन मागे घेतले नाही. यावेळी शरद पवार यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"