बारामती : गाव तिथे सोशल मीडिया व शहरातील प्रभाग तिथे सोशल मीडिया अशी संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबवावी. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणे व केलेली विकासकामे लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचणे शक्य होईल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी निसर्ग कार्यालय गुलटेकडी येथे सुळे यांनी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या, सोशल मीडियावर काम करताना महिलांवर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट किंवा कॉमेंट करू नये. स्त्रियांचा आदर राखला जावा. सोशल मीडियाच्या कायदेशीर नियमांचे पालन करावे. व्यक्तिश: कोणावर टीका-टिपणी करू नये, त्यांना आपल्या कार्यातून उत्तर द्यावे, पक्षाची ध्येयधोरणे व उद्दिष्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावीत.
यावेळी कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया सेलला फ्रंटल संघटनेत घ्यावे, अशी मागणी केली. त्यावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष प्रशांत सायकर, सतीश पवार, अमोल कावळे, तुषार लोखंडे, सूर्यकांत पिसाळ, पैगंबर शेख, अक्षय होळकर, तुषार सावंत, सुशांत कुतवळ, संदीप मालुसरे, सुरज सावंत, नितीन यादव, महादेव बालगुडे आदी उपस्थित होते.