NCP Dilip Mohite Patil ( Marathi News ) :शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीत रणकंदन सुरू आहे. शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून या मतदारसंघात उमेदवाराचा शोध सुरू आहे. या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांनाच शिवसेनेतून आपल्या पक्षात घेत उमेदवारी देण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र आढळराव पाटलांच्या उमेदवारीच्या चर्चेने दुखावलेले राष्ट्रवादीचे खेडमधील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे काल आढळराव यांनी मोहिते पाटलांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही मोहिते पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी पक्षाला आक्रमक इशारा दिला आहे.
"मला राजकारणात जे काही मिळालं ते अजित पवार यांच्यामुळे मिळालं, याची जाणीव मला आहे. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत. मी शरद पवार यांची साथ सोडून त्यांच्यासोबत आलो आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली तर मी शरद पवार यांच्या पक्षात न जाता राजकीय निवृत्ती घेईन," अशी घोषणा दिलीप मोहिते यांनी केली आहे.
"महायुतीत जाताना पक्षाने विश्वासात घेतलं नाही"
शिवाजी आढळराव यांच्याविषयी नाराजी व्यक्त करताना आणि महायुतीत सामील होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयावर निशाणा साधताना दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं की, "शिवाजी आढळराव आणि आमच्यात राजकीय मतभेद आहेत. राजकारण तत्वाने केलं तर अडचण येत नाही, मात्र खुनशीने राजकारण केलं, दुसऱ्याला संपवायचं, तुरुंगात टाकायचं, असं राजकारण केलं तर ते टिकत नाही. शिवाजी आढळराव यांनी माझ्याबाबत तेच केलं. एकदम टोकाचं राजकारण त्यांनी केलं. म्हणून त्यांना माझा विरोध आहे. हे त्यांनी माझ्यासोबत एक-दोन दिवस नाही तर २० वर्ष असंच केलं. त्यामुळे त्यांची संगत नकोच, अशी माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. महायुतीत सामील होताना पक्षाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही. आपल्याला हवे ते अधिकारी मिळतील, निधी मिळेल, महामंडळे मिळतील, अशी गाजरे दाखवण्यात आली. सत्तेत सामील झाल्यावर आज नेमकं काय झालं? फक्त नऊ लोकांना संधी मिळाली. एकत्रित बैठकाही कधी झाल्या नाहीत. या सगळ्या गोष्टींचा त्रास माझ्यासारख्याला त्रास होतो. त्यामुळे माझी भूमिका कायम आहे," असं मोहिते यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, "खेड तालुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता काही गोष्टी करणार असाल तर जे घडेल, त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. शिवाजी आढळराव यांच्या बाबतीत आमचे टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना साध देऊ, असं गृहित धरू नये," असंही दिलीप मोहिते यांनी म्हटलं आहे.