बारामती: इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे अनेक योजना अडकून पडल्या आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात मांडलेल्या बजेटमधील निधीसुद्धा अजून खर्च झालेला नाही. राज्यातील पोटनिवडणूकींचा लागलेला निकाल हा शिंदे-फडणवीस यांच्या बाजूने लागलेला नाही. जे सर्व्हे येत आहेत त्यावरून त्यांच्या विरोधात कौल जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले,राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पत्नी आम्हाला गोळ्या घाला असे म्हणत असतील .तर देशात एजन्सीज गैरवापर किती भयानक पद्धतीने सुरु आहे, हे दिसून येईल. अशा पद्धतीचा गैरवापर अत्यंत दुदैवी आहे. कोल्हापूरातील पोटनिवडणूकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मतदारांशी बोलताना भाजपला सहकार्य केले नाही. तर आम्ही ईडीची कारवाई करू, असे सांगितले होते. यावरून भाजप नेत्यांना या एजन्सीजचा दुरुपयोग कसा करता येईल याची घमंड असल्याचे दिसून येते.
मुश्रीफ यांच्या घरी अनेकदा छापे मारल्यावर पुन्हा छापे टाकले जात आहेत. यात कदाचित अधिकाºयांची चूक नसावी. राज्य सरकारमधील काही लोक केंद्राला सांगून या एजन्सीजचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही जर चुक केली नसताना तुमच्या घरी वारंवार छापे टाकून कुटुंबाला त्रास दिला जात असेल.तर कुटुंबाची मानसिकता काय होत असेल ,असा सवाल पवार यांनी केला. मुश्रीफ यांच्या पत्नीने व्यक्त केलेली भावना अतिशय दु:खद असल्याचे पवार म्हणाले.