Pune Accident : पुणे पोर्श अपघातानंतर सातत्याने भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशातच पुण्यातून अपघाताचे आणखी एक हायप्रोफाईल प्रकरण समोर आलं आहे. पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव कारने दोन जणांना उडवलं. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या पुतण्याकडून हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते याच्या फॉर्च्युनर गाडीने तरुणाचा बळी घेतला आहे. जुना पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत फॉर्च्युनरने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला धडक दिल्याने ओम उर्फ बंटी सुनील भालेराव (वय १९ रा. कळंब सहानेमळा) हा तरुण ठार झाला आहे. अपघातानंतर मयूर मोहिते मदत न करता पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र ग्रामस्थांनी त्याला रोखले.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच १४ के जे ७५५७ ही गाडी घेऊन कळंब बाजूकडून मंचरकडे भरधाव वेगाने चालला होता. त्याचवेळी कळंब गावच्या सहाने मळ्यात राहणारा ओम उर्फ बंटी सुनील भालेराव हा मोटरसायकलवरून कळंब गावाकडे चालला होता. जुना पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोहिते यांच्या फॉर्च्युनर गाडीची दुचकीला जोरदार धडक बसली. दुचाकी चालक ओम सुनील भालेराव हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.
अपघातानंतर मयूर मोहिते हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र एका स्थानिक ग्रामस्थाने त्याच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावली जखमी ओम भालेराव यांच्या मदतीला धावले. या सगळ्या प्रकारानंतरही मयूर मोहिते गाडीतून उतरण्यास तयार नव्हता. स्थानिक तरुणांनी बडबड केल्यानंतर तो खाली उतरला. त्यानंतर कळंब गावातील तरुण शुभम भालेराव, शैलेश भालेराव, सचिन वायाळ यांनी पोलिसांना माहिती दिली.
जखमी ओम भालेराव याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने कळंब परिसरात खळबळ उडाली. अपघातात ठार झालेला ओम भालेराव हा एकुलता एक मुलगा होता. त्याचा स्वभाव हसरा व मनमिळावू होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. खेडच्या आमदाराच्या पुतण्याने तरुणाचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ देत होते. रविवारी सकाळी नऊ वाजता ओम भालेराव याच्यावर कळंब येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, नितीन रामचंद्र भालेराव यांनी फिर्याद दिल्यानंतर मंचर पोलीस ठाण्यात आमदारांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे करत आहेत.