बारामती: बारामतीत दरवर्षी दिवाळीत पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी, दिवाळी शुभेच्छा देण्यास राज्यातून कार्यकर्ते येतात. या रांगेत बड्या राजकारण्यांपासून कार्यकर्ते, सामान्य नागरिकांचा समावेश असतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार सुळे या भावनावश झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मनावर दगड ठेऊन नेहमीचा भेटीगाठीचा शिरस्ता मोडणे भाग आहे. आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास असल्याचे खासदार सुळे यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.खासदार सुळे म्हणतात, नमस्कार, आपण सर्वजण दिवाळीचा सण साजरा करतोय. दिवाळीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आदरणीय पवार साहेब आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीला आवर्जून येतात. गेल्या काही दशकांपासून पवार कुटुंबीय आणि जनतेतील नात्याचे हे स्नेहबंध अधिक घट्ट करणारा हा शिरस्ता कायम आहे.दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आम्हाला लाभतात. अर्थात हेच तर आम्हा सर्वांचं बळ आहे,जे आम्हाला वर्षभर पुरतं. पण यावर्षीचा सण हा नेहमीसारखा नाही.दिवाळीचा आनंद साजरा करताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर काही मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मर्यादांचे भान सर्वांनाच राखावे लागणार आहे. यामुळेच मनावर दगड ठेवून,नेहमीचा शिरस्ता मोडत आम्ही पवार कुटुंबीयांनी या दिवाळीत कोणालाही भेटायचं नाही, असं ठरविलं आहे. आम्हा सर्वांना तुमची आपुलकी,प्रेम,स्नेह व आशीर्वाद यांची उणीव भासेल,याची आम्हाला जाणीव आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भेटीगाठीचा दरवर्षीचा हा शिरस्ता मोडणं भाग आहे. आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. यापुर्वीही पवार कुटुंबीयांच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रकाशित करण्यात आले होते. जर नजरचुकीने कोणाच्या वाचण्यात ते निवेदन आले नसेल, तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, यंदाच्या दिवाळीत कृपया कोणीही भेटीसाठी बारामतीला येऊ नये. कोरोनाचे संकट टळल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने हा दिवाळीचा उत्सव साजरा करु. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी आणणारी असो , अशा शुभेच्छा देखील खासदार सुळे यांनी दिल्या आहेत
...त्यामुळे दिवाळी सणाचा नेहमीचा शिरस्ता मोडावा लागला; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 2:56 PM