पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे आणि पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान मोदी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.
''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यभूमी महाराष्ट्राचा अपमान केला. त्याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे "मोदी गो बॅक आंदोलन" ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.''
जगताप म्हणाले, मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना काळाचा संदर्भ देत स्वराज्यभूमी महाराष्ट्राचा अपमान केला. त्याच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे "मोदी गो बॅक आंदोलन" ६ मार्चला संपूर्ण पुणे शहरात करणार आहे.
काळे कपडे घालून निषेध आंदोलन
या महाराष्ट्रद्रोही भाजप सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे. अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे.