पुणे :शरद पवार, अजित पवार यांची अदानीसंदर्भातील आणि इतर वक्तव्ये पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला आता उद्धव ठाकरे यांची गरज उरलेली दिसत नाही, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही ४० जण एकत्रच आहाेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही ते म्हणाले.
रात्री उशिरा पुण्यात आलेल्या देसाई यांनी पत्रकारांशी बाेलताना ही टीका केली. सत्ता हवी म्हणून पवारांनी उद्धव ठाकरे यांना जवळ केले, आता त्यांची ती गरज संपली आहे. त्यामुळेच शरद पवार अदानींबाबतची चौकशी नको म्हणतात, अजित पवारांना मोदींची डिग्री नको वाटते. बाळासाहेब सत्तेचा रिमोट स्वतःजवळ ठेवायचे. उद्धव यांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी रिमाेट शरद पवारांकडे दिला, अशी टीकादेखील देसाई यांनी केली.
निवडणुकीतील जागावाटपाची सगळी जबाबदारी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यांच्यात काही मतभेद नाहीत व आम्हा ४० जणांमध्येही काही मतभेद नाहीत. अयोध्येचा दौरा आम्ही श्रद्धेने केला. भाजप बरोबर होतेच. दोघांचेही झेंडे लखनौपासून एकत्रच होते. घट्ट आहोत. सर्वच देवदेवतांचे दर्शन आम्ही घेतो, त्यात काही विशेष नाही. हिंदुत्वासाठी शिवसेना व भाजपची युती आहे. कायद्यानेच आता आमची शिवसेनाच खरी असल्याचे सिद्ध झाले आहे. आयोगाने सर्व अभ्यास करूनच आम्हाला चिन्ह दिले. सर्वोच्च न्यायालयानेही या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला, असेही देसाई यांनी सांगितले.