पुणे : पुणेकरांवर तब्बल ११ टक्के मिळकतकर वाढीचा प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा विरोध असून ही वाढ म्हणजे प्रामाणिक पुणेकरांची पिळवणूक आहे. त्यामुळे ही करवाढ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
पालिकेकडून सद्यस्थितीत केल्या जाणाऱ्या कर आकारणीबाबतही नागरिकांच्या तक्रारी असून हा दर अधिक आहे. मिळकतकरावर दिली जाणारी सूट बंद केली आहे. नव्याने कर आकारणी करताना खूपच जास्त आकारणी केली जात आहे. त्यातही पुन्हा नव्याने ११ टक्के वाढ म्हणजे सर्वसामान्यांची पिळवणूक आहे. आधीच्या २३ गावांमध्ये कर आकारणी झालेली नसून त्यानंतर समाविष्ट केलेल्या ११ गावांमध्ये अद्याप मुलभूत सोयी सुविधा पुरविलेल्या नाहीत. असे असतानाही कर आकारणीचा घाट कशासाठी? पालिका हद्दीत नव्याने २३ गावे समाविष्ट होणार असून त्याठिकाणी देखील कर आकारणी करणार आहे.
पालिका हद्दीतील सर्व मिळकतींवर कर आकारणी न करता जे नियमित कर भरतात त्यांचा मिळकत कर वाढविणे हा अन्याय आहे. जोपर्यंत पुणे शहरातील सर्व मिळकतींवर कर आकारणी होत नाही तोपर्यंत जे नियमित कर भरतात त्यांचा मिळकत कर वाढविण्यास राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे धुमाळ म्हणाल्या. मिळकत कराबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्याची मागणी धुमाळ यांनी केली.
--
वसतिगृहाची क्षमता ४०० च्या आसपास
कोरोनामुळे बंद ठेवलेले पालिकेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह घोले रोड येथे असून ते अजुनही बंद अवस्थेत आहे. या वसतिगृहाची क्षमता ४०० च्या आसपास आहे. विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीया जवळपास पूर्ण झाल्या आहेत. महाविद्यालये सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यांना तातडीने वसतीगृहात प्रवेश द्यावा. तसेच चालु शैक्षणिक वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करुन वसतीगृह तातडीने खुले करावी अशी मागणी धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.