शरद पवारांनी अजितदादांचे कान टोचले! छ. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर? स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 05:59 PM2023-01-03T17:59:50+5:302023-01-03T18:18:44+5:30
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून स्वराज्यरक्षक म्हंटले पाहिजे, असं वक्तव्य केले होते.
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून स्वराज्यरक्षक म्हंटले पाहिजे, असं वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात भाजपने आंदोलन केले. त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपही झाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'छत्रपती संभाजीराजे यांना काहीजण त्यांचे काम म्हणून स्वराज्यरक्षक म्हणून उल्लेख करत असतील तर त्याला माझी काही तक्रार नाही. काही घटक आता धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील आणि फक्त ते धर्माच्या अँगलने विचार करत असतील तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. हे मांडण्याचा त्याला अधिकार आहे. ज्याला धर्मवीर म्हणायच आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी ते म्हणावं, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली.
राज्यात धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षकवरुन वाद नको. महापुरुषांवरुन अकारण वाद नको, मी अजित पवार यांचे वक्तव्य टीव्हीवरच पाहिले आहे. राज्यात लोकांचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलणं टाळले.
विरोधी पक्षनेते अजित पवार नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र हिवाळी अधिवेनावेळी विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.