पुणे : एमपीएससीच्या परीक्षेत दहीहंडीतील खेळाडूंनाही आरक्षण मिळेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध म्हणून पुणेराष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागाने पक्षाने पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर मंगळागौरी ,डोंबारी, लुडो ,गोट्या खेळत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विविध नवीन खेळ सहभागी करून परीक्षेचा दर्जा कमी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. नऊवारी नेसून आलेल्या महिला मंगळागौरीची गाणी गात फर्गुसन रस्त्यावर सोमवारी सकाळी पहावयास मिळाल्या. त्याच सोबत वेगवेगळे तरुण गोट्या खेळून सरकारचा निषेध करताना दिसले. यावेळी काही युवक आणि युवती सापशिडी, विटी दांडू असे खेळ खेळून सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसले. याच प्रसंगी काही तरुणांनी अभ्यास करत पुस्तके घेऊन अभ्यास करणाऱ्यांना सरकार कमी लेखत असल्याचे दाखवून दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत दहीहंडीतील खेळाडूंनाही आरक्षण मिळेल असे सांगून गुणवत्तेची खिल्ली उडविली.' पन्नास खोके, एकदम ओके' यानुसार हे सरकार सत्तेत आले असून त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा नाही.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दहीहंडी फोडणे ,डोंबऱ्याचे खेळ करणे ,मंगळागौरी खेळ करणे, सापशिडी खेळणे , विटी दांडू खेळणे असे उद्योग करावे लागतील. सरकारने या गोष्टीचा वेळीच निर्णय घेऊन त्याबाबत ठोस पावले उचलावीत. अन्यथा, आगामी काळात आम्ही आणखी आक्रमक पद्धतीने आंदोलन करू.