पुणे : आमची आघाडी आहे, मात्र जागा वाटपाच्या निर्णयाची वाट पाहण्यात अर्थ नाही, जागा कोणतीही मिळो आम्ही कुठेही तयार आहोत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील आठही मतदारसंघांसाठी निरीक्षक नियुक्त केले आहेत. विधानसभा इच्छुकांची त्यांनी मागणी केलेला मतदारसंघ वगळून दुसरीकडे निरिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पर्वती विधानसभा-विशाल तांबे, प्रदीप गायकवाड, जगन्नाथ शेवाळे. वडगाव शेरी-मोहनसिंग राजपाल, रविंद्र माळवदकर. खडकवासला-सुभाष जगताप, सुनिल खाटपे. हडपसर-भगवान साळुंके, भय्यासाहेब जाधव. कसबा-प्रशांत जगताप. कोथरूड-राजलक्ष्मी भोसले, रवी चौधरी. कॅन्टोन्मेट-बाबूराव चांदेरे, बाबा धुमाळ. शिवाजीनगर-कमल ढोले पाटील, अप्पा रेणूसे.पक्षातील सुत्रांनी सांगितले की, शहर काँग्रेसकडून विधानसभेसाठी काहीही हालचाल सुरू नाही. जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्याला विलंब लागू शकतो. तोपर्यंत शांत बसून राहिले तर त्यामुळे चुकीचा संदेश जाईल. हे लक्षात घेऊन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, मतदानकेंद्र निहाय नियोजन करणे, कार्यकर्त्यांना मतदार यादी वाचन करण्यास सांगणे अशी कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काँग्रेसलाही उपयोगच होईल.राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यातील सर्व जागा लढवण्याची तयारी आहे. त्यामुळेच पक्षाने निरीक्षक नियुक्त केले आहेत. जागा वाटप होऊन काही जागा काँग्रेसला गेल्या तरीही आमची तिथली यंत्रणा बैठका, चर्चा यामुळे कार्यान्वित होणार आहे. काँग्रेसचा उमेदवार असेल तर त्यांनाही उपयोगच होईल.चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस